- प्राधिकरणातील कॅम्प एज्युकेशनच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘शिवराज्याभिषेक’ दिन साजरा..
- संस्थेच्या माजी विद्यार्थांनी दिला ‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. ०७ जून २०२५) :- छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील महान राजांपैकी एक होते. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात त्यांच्या राज्याभिषेक दिनाला विशेष महत्त्व आहे. ‘शिवराज्याभिषेक’ हा सोहळा महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. या दिवशी शिवाजी महाराज विधीपूर्वक छत्रपती झाले आणि मराठा साम्राज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यांनी बालपणापासूनच राजकारण, युद्धशास्त्र आणि लोकसेवा यांचा अभ्यास केला होता. म्हणूनच आजही त्यांना जगातील महान योद्ध्यांपैकी एक मानले जाते. आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी त्यांची शिकवण अंगीकारावी. विद्यार्थीदशेत मोबाईलचा हवा तेवढाच वापर करावा. आपल्या पालकांशी संवाद ठेवावा. कॅम्प एज्युकेशनमधील आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी आज बाहेर मोठ्या पदावर काम करत आहेत. त्यांचा आणि आपल्या गुरुजनांचा आदर्श घेऊन यशोशिखरे गाठण्यात नक्कीच तुम्हाला यश मिळेल, असे प्रतिपादन संतोष सौंदणकर यांनी केले.
प्राधिकरणातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शुक्रवारी (दि. ०६) रोजी संस्थेच्या प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी सौंदणकर हे बोलत होते. यावेळी संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी प्राचार्य बसवराज विभूते सर यांचा सत्कार केला.
कार्यक्रमास जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रतिभा चव्हाण, समुपदेशक प्रा. नुतन आपटे, उद्योजक तथा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर, उद्योजक मिलींद पाचपांडे, उद्योजक प्रदिप भोसले, कॅम्प एज्युकेशन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बसवराज विभुते, गटनिदेशक मनिषा गाढवे, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्योजक मिलिंद पाचपांडे म्हणाले, आयटीआयमुळे उद्योजक घडतात. मी ही याच संस्थेमधून आयटीआय प्रशिक्षण घेऊन आज एक मोठा उद्योजक झालो आहे. महिंद्रा सारख्या नामांकित कंपनीत नोकरी केली. आज त्याच कंपनीतील मोठे अधिकारी माझ्या कंपनीत नोकरीला आहेत. नुसते आयटीआय करून स्वस्त बसू नका पुढे शिक्षण घ्या.
नूतन आपटे म्हणाल्या, आयटीआयचे विद्यार्थी हे समाजाचे देणे लागतात. संस्कार, संस्कृती आणि मेहनतीमुळे त्यांच्या हातून सुंदर शिल्पाची निर्मिती व्हावी. आज माझ्या हाताखाली घडलेले माजी विद्यार्थी माझ्याशेजारी व्यासपीठावर बसले, याचा मला मोठा अभिमान वाटतो. शिवराज्यभिषेक दिनी जय शिवाजी आत्मसात करा. ज्ञानात, प्रगतीत स्थिर व्हा.
संस्थेच्या विद्यार्थीनींनी शेवटी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणेने कार्यक्रमाचा समारोप झाला.












