न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी ३० जून २०२५ पूर्वी मालमत्ता कर भरून महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या विविध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
नागरिकांनी महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन कर भरल्यास, त्यांना थेट १० टक्क्यांपर्यंत कर सवलत दिली जात आहे. तसेच, महिलांच्या नावावर नोंद असलेल्या मालमत्तांवर ३० टक्क्यांपर्यंत करसवलत दिली जात असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महापालिकेचे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महापालिकेने पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या गृहनिर्माण संस्था, दिव्यांग व्यक्तींच्या नावावर असलेल्या मालमत्ता, तसेच महिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तांना सामान्य करात सवलत देण्याचे धोरण स्वीकारले आहे.
दरम्यान, सध्या महापालिकेकडे थकीत मालमत्ता कराच्या रकमेत लक्षणीय वाढ झाली असून, यात १० हजार पुढील सुमारे ७६ हजार ६८८ मालमत्ताधारांकडे ४९८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदार मालमत्ता धारकांना पालिकेच्या वतीने थकबाकीची बिलासोबतच जप्तीपूर्व नोटीस पाठविण्यात आली आहे. वेळेवर कर न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही कर संकलन विभागाने स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत ऑनलाईन माध्यमातून कर भरणाऱ्या सुमारे १ लाख ८९ हजार ८२३ नागरिकांनी १० टक्के सवलतीचा लाभ घेतला असून, केवळ ऑनलाईन व्यवहारांमधूनच १८९.५२ कोटी रुपये जमा झाले आहेत.ऑनलाइन कर भरणा प्रणालीला पिंपरी चिंचवडकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महापालिकेच्या वतीने करदात्यांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ऑनलाइन माध्यमातून कर भरल्यास १० टक्के सवलत, तसेच महिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तांना ३० टक्क्यांपर्यंतच्या लोकाभिमूख सवलत योजना आहे.थकीत कर न भरल्यास मात्र नियमानुसार जप्तीची कारवाई होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. –
– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका…


















