न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथील कुदळवाडी भागातील अनधिकृत बांधकामे आणि भंगारच्या पत्राशेडवर धडक कारवाई करीत ती पाडण्यात आली. या कारवाईवेळी काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची नजर ठेवण्यात आली होती. त्यासाठी तब्बल १२ लाख ३४ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला.
महापालिकेकडून कुदळवाडीत मोठी धडक कारवाई करत अनधिकृत भंगार गोदामे, लघुउद्योग व विविध आस्थापना भुईसपाट करण्यात आल्या. चिखली येथील जाधववाडी, कुदळवाडी, बालघरेवस्ती, हरगुडेवस्ती, पवारवस्ती येथे अनेक अनधिकृत भंगाराचे गोडाऊन होते. त्यामध्ये प्लास्टिक मटेरियल, रबर, खराब
झालेला फ्रिज, एसी, टीव्ही यांचे पार्टचे गोडाऊनमध्ये वर्गीकरण न करता कमी जागेत जास्त साठवणूक केली होती. याठिकाणी वारंवार आग लागण्याच्या घटना घडत होत्या. येथील अनधिकृत बांधकामांवर सलग आठवड्याभर कारवाई करण्यात आली.
कारवाई करत असताना काही अनुचित प्रकार घडू नये, तसेच परिस्थितीवर नियंत्रण व निरीक्षण ठेवण्याच्या दृष्टिकोनातुन ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यात आले. त्यासाठी ४ ड्रोन वापरले. त्या कामासाठी दर्शन डिजिटल व्हिडिओग्राफीला १८२ फ्लाइटसाठी ५ हजार ७५० याप्रमाणे १२ लाख ३४ हजार ८७० रुपये देण्यात आले. त्या खर्चास महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.















