न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे निलख (दि. २२ जून २०२५) :- ‘तिचा नाद सोडून दे, सांगूनही ऐकत नाहीस? तुला जिवंत सोडत नाही’, असे म्हणत दोघांनी रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. १९) रात्री साडेदहाच्या सुमारास पिंपळे निलख येथील रक्षक चौक येथे घडली. यात संदीप रामचंद्र साठे (वय ३८, रा. रहाटणी) जखमी झाले.
याबाबत साठे यांच्या पत्नीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी मल्हारी नवनाथ जोगदंड ऊर्फ बाबा (रा. रहाटणी) व तेजस चव्हाण (रा. पवनानगर, रहाटणी) यांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी संदीप साठे व त्यांचा मित्र बाळू पवार हे दोघे मल्हारी जोगदंडचा वाढदिवस साजरा करण्याकरिता त्याच्या घरी गेले होते. वाढदिवस साजरा करून औंधकडे येताना ते रक्षक चौक येथे आले असता त्यांची रिक्षा आडवी लावण्यात आली. दोघांना रिक्षातून खाली रस्त्यावर ओढत मारहाण करण्यास सुरुवात केली.











