न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२५) :- नाशिक फाटा ते मोशीतील इंद्रायणी नदीपर्यंत मंजूर विकास योजनेतील ६१ मीटर रुंद पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग जात आहे. तो विकसित करण्याची कार्यवाही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे. मात्र, रस्त्याच्या भूसंपादनासाठी लागणारा सुमारे २६३ कोटीचा निधी भरण्याची क्षमता महापालिकेकडे नाही. त्यामुळे तो राज्य शासनाने द्यावा, अशी मागणी आयुक्त शेखर सिंह यांनी शासनाकडे केली आहे.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत पुणे महापालिकेला चांदणी चौक येथील उड्डाणपुलास सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडला २६३ कोटी देण्याची मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जाणाऱ्या नाशिक फाटा ते खेड रस्त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यास मदत होणार आहे. बहुस्तरीय उड्डाणपूल, पर्पल लाइनवरील मेट्रो स्टेशन आणि आठपदरी नाशिक फाटा ते खेड एक्स्प्रेस कॉरिडॉरसह वाहतूक आणि पायाभूत सुविधा देण्यात येणार आहे.
ऑगस्ट २०२४ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिली. हा ३० किलोमीटरचा उन्नत एक्सप्रेस कॉरिडॉर आहे. तो निवासी क्षेत्र, भोसरी आणि चाकण औद्योगिक केंद्रांना जोडतो. भोसरी, बोर्हाडेवाडी, मोशी या गावांतून जातो. नाशिक फाटा उड्डाणपुलाचे अपग्रेडेशन होणार आहे. आठ पदरी उन्नत उड्डाणपुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम लवकरच सुरू होईल. ज्यामध्ये विद्यमान रस्ता चार ते सहा पदरी होणार असून, दोन्ही बाजूंना सेवा रस्ते असतील. रस्त्यासाठी भूसंपादनास नुकसान भरपाईची रक्कम ५९ व ३७ लाख लागणार आहे. दोन्ही टप्प्यांची एकूण लांबी ६२०० मी आणि १२३८४३ चौ.मी. क्षेत्राच्या भूसंपादनासाठी अंदाजित रक्कम २६२ कोटी ७२ लाख १६ हजार अपेक्षित आहे. मात्र भूसंपादनास महापालिकेकडे निधीची कमतरता आहे.
















