- गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई; वाहन चोरीचे ३४ गुन्हे उघड…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.११ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-२ने सराईत मोटारसायकल चोराला अटक करून २१ लाख ६६ हजार रुपये किमतीच्या ४० मोटारसायकली जप्त केल्या असून वाहन चोरीचे एकूण ३४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
बावधन पोलीस ठाणे हद्दीत नांदे गावातून स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-२कडे वर्ग करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी ७० ते ८० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपी आश्पाक ईसाक पठाण (वय ३२, रा. पाडळी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याला बालेवाडी परिसरातून अटक केली.
पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपीने अनेक मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्या गाड्या मुकुंद उद्धवराव हारदास (वय २५, रा. जालना) याला विकत असल्याचेही निष्पन्न झाले. या प्रकरणी त्यालाही अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने केली.












