न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 08 जुलै 2025) :- महापालिकेकडे इंडस्ट्रियल टू रेसिडेन्सियल (आयटूआर) अंतर्गत संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनच्या समोरील आयसीसी देवी टॉवरशेजारील जागा उपलब्ध झाली आहे. त्या ठिकाणी ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाची नवीन हरित इमारत (ग्रीन बिल्डींग) उभारण्यात येणार आहे. लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे.
आयटूआर’ अंतर्गत तेथील जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. तेथे ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ३ ऑक्टोबर २०२४ ला ५२ कोटी रूपये निधीस मंजुरी देण्यात आली आहे. अर्थसंकल्पात २ कोटी ५८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. इमारत उभारण्यास आयुक्तांनी २८ ऑक्टोबर २०२२ ला मंजुरी दिली आहे.
त्या इमारतीचे डिझाईन करण्यासाठी ज्योती पानसे असोसिएटस या आर्किटेक्टची नियुक्ती ९ जुलै २०२४ ला करण्यात आली आहे. त्यांनी २२ मे २०२४ ला आयुक्तांच्या दालनात त्यासंदर्भातील सादरीकरण केले. १८ मार्च २०२५ च्या बैठकीत ती इमारत ग्रीन बिल्डींग करण्यात यावी, सोलर पॅनेल लावण्यात यावेत, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यामुळे इमारतीचा खर्च ५२ कोटींवरून ६० कोटींवर गेला आहे.
क्षेत्रीय कार्यालयाची ग्रीन इमारत उभारण्यासाठी वाढीव खर्चास पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच इमारती कामाची निविदा प्रसिद्ध करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.










