न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२५) :- गुरुद्वारा परिसर,बिजलीनगर, चिंचवडेनगर ,थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, कासारवाडी परिसरातील ४००० पेक्षा जास्त नागरिकांनी एचसीएमटीआर च्या विराधात हरकत नोंदवल्या. त्यामुळे हरकती घेण्यासाठी दिलेल्या कालावधीत म्हणजेच अंतिम टप्प्यात हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला. ह्या प्रसंगी घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड यांची भेट घेतली व एचसीएमटीआर आरेखनासाठी “चेंज अलायमेंट अहवाला संदर्भात चर्चा केली.
यावेळी घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक डॉ.विजयकुमार पाटील, नारायण चिघळीकर, माऊली जगताप, प्रितम पवार,अन्वर शेख, नंदकुमार नायकोडी, सचिन पोखरकर, गौशिया शेख, केशर मेहर, श्यामलाताई गायकवाड, माणिक सुरसे, बाळूराम चौधरी, पांडुरंग काळे, विपुल जगताप हे उपस्थित होते.
या संदर्भात नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी एचसीएमटीआर बाबत बधितांच्या हरकती स्वीकारल्या. त्याचप्रमाणे एकही घर न पडता रिंग रस्ता कसा बदलवता येईल या संदर्भात मुख्य समन्वयक डॉ विजयकुमार पाटील यांचेकडून डी पी आरेखन समजून घेतले.
या बाबत डॉ.विजयकुमार पाटील म्हणाले,” नियोजित रिंग रस्ता विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील हजारो कुटुंबीयांचा मोठा रोष आहे. या प्रकल्पामुळे नऊ हजारापेक्षा जास्त कुटुंबे बाधित होणार आहेत. त्यांच्या घरावर असलेल्या या टांगत्या तलवारीमुळे जनतेमध्ये मोठा आक्रोश आहे. राईट कंपनी व एच सी पी कंपनी ह्यांनी सुद्धा याबत एक सविस्तर अहवाल केला असतानासुद्धा सदरचा अहवाल पालिका प्रशासनाने दडपला व बनावट रित्या पुन्हा जुनाच डी पी रस्ता प्रतिबिंबित केला. अगदी दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या लेखी सूचनेकडेही दुर्लक्ष केले. अशी मुजोरी डीपी समितीच्या सदस्यांना शोभणारी नाही.”
१४ जुलै २०२५ ही हरकती घेण्यासाठी अंतिम केलेली तारीख असल्याने शहरातील विविध आरक्षणामुळे बाधित होत असलेल्या नागरिकांनी हरकत तात्काळ नोंदविण्याचे आवाहन पाटील यांनी केले.











