न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. आयुक्त हेच प्रशासक आहेत. स्थायी समितीची सभा तेच घेत आहेत. त्यांनी आयुक्त दालनात मंगळवारी (दि.१५) स्थायी समितीची विशेष बैठक घेतली. त्यात त्यांनी अनेक विषयांना मंजुरी दिली. मात्र, मंजुरीनंतर ते प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी नगर सचिव विभागाकडे दुसऱ्या दिवशी बुधवार (दि. १६) सायंकाळपर्यंत आले नव्हते. त्यामुळे मंजुरी दिलेल्या विषयांबाबत इतकी गुप्तता का पाळली जात आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
महापालिकेत १३ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. आयुक्त हेच सर्वसाधारण सभा, स्थायी समिती तसेच, विषय समितीच्या बैठका घेऊन विविध विभागांच्या असंख्य प्रस्तावांना तसेच, खर्चाना मंजुरी देत आहेत. खर्चिक विषयांनाही सढळ हाताने मान्यता दिली जात आहे. महापालिका भवनातील मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समितीची विशेष बैठक आयुक्तांच्या दालनात मंगळवारी दुपारी साडेतीननंतर झाली. त्यात आयुक्तांनी विविध विषयांना मंजुरी दिली.
मंगळवारी विशेष बैठक घेऊन आयुक्त स्थायी समिती सभा घेतात. मात्र, मंगळवारची (दि. १५) बैठक त्यांनी आपल्या दालनात घेतली. या वेळी विषयाशी संबंधित अधिकारी व नगर सचिव उपस्थित होते. आयुक्तांनी अनेक कामांच्या खर्चाना मंजुरी दिली. त्यावर त्यांच्या सह्यांही झाल्या आहेत. त्यानंतर ते सर्व नियमानुसार पुढील कार्यवाहीसाठी नगरसचिव विभागाकडे दाखल करणे आवश्यक आहे. मात्र, बैठक होऊन दुसरा दिवस उलटला तरी, ते सर्व प्रस्ताव आयुक्तांकडेच असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. बुधवारी सायंकाळपर्यंत प्रस्ताव नगर सचिव विभागाकडे उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे त्या प्रस्तावात लपविण्यासारखे काय आहे, इतकी गुप्तता का पाळली जात आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणावरून महापालिका वर्तुळात चर्चा रंगली होती.
दरम्यान, आयुक्त शेखर सिंह हे बुधवारी (दि. १६) आणि गुरुवारी (दि. १७) रजेवर होते. स्थायी समिती सभेच्या मंजूर प्रस्तावाच्या फाईलीबाबत विचारणा केली असता, फाईल नगर सचिव विभागाकडे पाठविण्यात आल्याचे आयुक्तांच्या स्वीय सहायकांकडून सांगण्यात आले. मात्र, नगर सचिव विभागाकडे फाईल आली नसल्याचे उत्तर देण्यात आले.












