- गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४५ लाखांनी अधिक पाणीपट्टी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील वर्षापासून मालमत्ता करासोबतच पाणीपट्टीची वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महसूल वाढीच्या दृष्टीने फायदेशीर ठरला असून, २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १५ कोटी ५३ लाख ११ हजार ७३० रुपयांची पाणीपट्टी महापालिकेने वसूल केली आहे.
शहरातील निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा मिळून सुमारे १ लाख ८० हजार ९०६ नळजोडधारक असून, त्यांच्याकडून विविध माध्यमांतून पाणीपट्टी भरली जात आहे. कर संकलन विभागाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे ही वसुली अधिक प्रभावीपणे पार पडली.
दरम्यान, शहरात अजूनही सुमारे ३२ हजार ४६० नळ धारकांकडून पाणीपट्टी थकलेली आहे. “थकबाकीदारांनी लवकरात लवकर पाणीपट्टी भरावी, अन्यथा नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई करण्यात येईल,” असा इशारा महापालिकेने दिला आहे.
कर संकलन विभागाच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी होताना दिसत आहे. नागरिकांनी देखील वेळेत पाणीपट्टी भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या तिमाहीत जमा झालेल्या रकमेचे माध्यमनिहाय तपशील पुढीलप्रमाणे –
धनादेशाद्वारे: ₹५ कोटी ९० लाख ९८ हजार ५८५
रोख स्वरूपात: ₹३ कोटी ९ लाख ७ हजार ९८६
ऑनलाइन भरणा: ₹६ कोटी ५३ लाख ५ हजार १५९
एकूण: ₹१५ कोटी ५३ लाख ११ हजार ७३०
पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी ग्राहकांना लवकरच नादुरुस्त अथवा बंद असलेले पाणीपट्टी मीटर दुरुस्त करण्याबाबत नोटीस देण्यात येणार आहे. सध्या अनेक ठिकाणी पाणीपट्टी मीटर नादुरुस्त असल्याने रिडिंग घेणे शक्य होत नाही. त्यामुळे बिलात अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन पाणीपट्टी मीटर लवकरात लवकर दुरुस्त करावेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणीपट्टी वसुलीची ही यशस्वी आकडेवारी ही संपूर्ण कर संकलन विभाग आणि पाणीपुरवठा विभागाच्या कामाचे फलित आहे. आम्ही डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करून नागरिकांना सुलभ सेवा देण्याचा प्रयत्न केला. नागरिकांचा प्रतिसाद समाधानकारक आहे.
– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका…












