- या युतीमुळे पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली – सुलभाताई उबाळे..
- आगामी निवडणुकीत निश्चितच चमत्कार पहायला मिळेल – मुकुंद रणदिवे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२५) :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला सोबत घेतलं आहे. युती विचारांची, विश्वासाची आणि विकासाची असं सांगत एकत्र येत त्यांनी युतीबाबत आज शुक्रवारी औपचारिक घोषणा केली आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहर शिवसेना आणि शहर रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पिंपरी येथील आंबेडकर चौकात एकत्रितपणे जमा झाले होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करीत सर्व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटत ढोल ताशाच्या गजरात आनंदउत्सव साजरा केला.
यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुलभाताई उबाळे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र संघटक मुकुंद रणदिवे, शहर प्रमुख राजू गायकवाड, महिला आघाडी अध्यक्षा उषा वाघमारे, उपजिल्हा प्रमुख दिलीप पांढरकर, चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर, शहर प्रवक्ता भीमराव सुरवसे, शहर संघटक रमेश कांबळे, शहर उपाध्यक्ष महिला आघाडी विमल प्रधान, सुमन जैस्वाल, पिंपरी विधानसभा प्रमुख सुवर्णा तडसरे, पिंपरी विधानसभा संघटिका सुवर्णा कुटे, चिंचवड विधानसभा प्रमुख शारदा वाघमोडे, पिंपळे गुरव विभाग संघटिका पोर्णिमा आमराव, महिला शाखा अध्यक्ष निगडी छाया क्षीरसागर, सायली साळवी युवा सेना जिल्हाप्रमुख मावळ लोकसभा, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष अर्चना गुरव, चिंचवड विधानसभा अध्यक्ष प्रियंका सुरेश चव्हाण, शिवसेना चिंचवड विधानसभा संघटक, उपशहराध्यक्ष युवासेना रवींद्र दिलीप शेलार, शिवसेना शहर समन्वयक हेमचंद्र जावळे, भरत वाघमारे, अजिंक्य उबाळे युवा सेना पुणे जिल्हाध्यक्ष, संतोष भोसले, सुहास तळेकर, अनिकेत येरुणकर, विशाल कोतवाल, शुद्धधन भालेराव, अमित शिंदे, अभिषेक सुरवसे, किशोर शिंदे, शुभम महाडिक, निलेश हाके, स्नेह गायकवाड, संगीता गायकवाड, इंदू आखव, तेजश्री ढोरे, अनिता शर्मा, सुनंदा पासरे, सुनिता हरपळे, अर्चना गुरव आदी उपस्थित होते.
उपनेत्या उबाळे म्हणाल्या, प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आणि बाळसाहेब ठाकरे यांची प्रचंड इच्छा आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आहे. या युतीमुळे पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आज हे शक्य झाले आहे. आनंदराज आंबेडकर यांचा आणि शिंदे साहेबांचा स्वभाव सर्वसामान्यांसारखा आहे. सर्वसामान्यांसाठी काहीतरी करावं हेच आमच्या पक्षाचं ध्येय असतं. सत्ता ही सर्वसामान्यांसाठी वापरली पाहिजे, गोरगोरीब, दलित, शोषित, कष्टकरी यांना सत्तेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी सत्ताधाऱ्यांनी काम केलं पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनाही तेच वाटायचे. एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने दलित आणि मराठी मनं यानिमित्ताने जुळविली आहेत.
जिल्हाप्रमुख वाल्हेकर म्हणाले, शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाल्याची घोषणा शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज केली. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आली आहेत. हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. त्यामुळे विरोधकांचा निश्चितच सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही.
रिपब्लिकन सेनेचे राज्य संघटक मुकुंद रणदिवे म्हणाले, आज बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसा असलेले आमचे नेते आंनदराज आंबेडकर हे आहेत. दलित, पीडित, शोषितांसाठी ते न थकता काम करत आहेत. शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाल्याची घोषणा मुंबई इथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आज करण्यात आली. विचारांची, विश्वासाची आणि विकासाची ही युती असल्याचे एकनाथ शिंदेंनी आम्हाला सांगितलं. दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंनी देखील शिवशक्ती-भीमशक्ती अशी युती केली होती. आज एकत्र आलेल्या शिवशक्ती आणि भीमशक्तीचा आगामी निवडणुकीत निश्चितच चमत्कार पहायला मिळेल.
शहर प्रमुख राजू गायकवाड म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शोषित आणि वंचितांसाठी सरकारच्या माध्यमातून विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यांनी केलेलं काम पटल्यामुळेच आंबेडकरी कार्यकर्त्यांची रिपब्लिक सेना आपल्याबरोबर आहे. कोणत्याही अटी शर्तींशिवाय ही युती होत असल्याने दोन्ही पक्षात समन्वय रहावा यासाठी आपण एकदिलाने काम करू. प्रास्ताविक शिवसेना चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी केले.














