- तक्रारी करणाऱ्या हिंजवडी सरपंचास घेतलं फैलावर..
- कामात अडथळा आणणाऱ्यांवर 353 लावण्याचे निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. 26 जुलै 2025) :- उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज शनिवारी (२६ जुलै) पहाटेच हिंजवडी परिसराचा पाहणी दौरा करत नागरी व वाहतूक समस्यांचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी दोन आठवड्यांपूर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी झाली का, याची पाहणी करीत गंभीर दखल घेतली. विकासकामांमध्ये अडथळा आणणाऱ्यांवर कठोर पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असून, “कोणीही मध्ये आलं तर त्याच्यावर 353 लावा, अगदी मीसुद्धा अडथळा ठरलो तरी लावा,” अशी स्पष्ट व सक्त ताकीद दिली.
अजित पवारांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) माध्यमातून सुरू असलेल्या रस्ते, वाहतूक सुधारणा व नागरी सुविधांच्या कामांची पाहणी केली. यावेळी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या काही व्यक्तींविषयी अधिकाऱ्यांनी तक्रार केली असता, अजित पवार ताडकन म्हणाले, “कामात कोणताही अडथळा खपवून घेतला जाणार नाही, त्याच्यावर तात्काळ 353 लावा.”
यावेळी अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांनाही खडेबोल सुनावले. “धरण करताना मंदिर जातं, तसंच हेही काम महत्त्वाचं आहे. इथलं आयटी पार्क हैदराबाद, बंगळुरुला जातंय, आणि आपण फक्त पाहत राहायचं का?” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या दौऱ्यात अजित पवारांनी अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा झापत, कामं वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. कोणताही राजकीय किंवा स्थानिक दबाव न घेता, ठरलेली कामं पूर्ण करा, असा पुनरुच्चार त्यांनी केला. पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवारांचा आक्रमक आणि ठाम पवित्रा पुन्हा एकदा पाहायला मिळाला.











