- रस्त्याचं फायनल होईना; आता रेल्वेच नवं गाजर?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २६ जुलै २०२५) :- पुणे जिल्ह्यातील तळेगाव, चाकण, आळंदी, शिक्रापूरसारख्या भागासाठी नेहमीप्रमाणे सरकारने नवीन रेल्वे प्रकल्पाच्या घोषणांची खैरात केली आहे. पुणे ते अहिल्यानगर हा नवीन रेल्वेमार्ग, तळेगाव ते उरुळी कांचन दरम्यान ७५ किलोमीटरचा मार्ग, आणि उरुळी कांचन येथे १०० हेक्टरवर उभारण्यात येणारे मेगा टर्मिनल, या सर्व गोष्टी फक्त कागदावरच दिसत आहेत. प्रत्यक्षात मागील अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अनुभवले आहे, की यापैकी कोणतीही योजना वेळेत पूर्ण होत नाही, उलट त्यातून अधिकच अडचणी निर्माण होतात.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, मागील अनुभव लक्षात घेता, अशा घोषणा म्हणजे निवडणुका जवळ आल्यावर जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा एक प्रकार वाटतो.
तळेगाव-चाकण परिसरात आधीच अपुऱ्या रस्त्यांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे जनजीवन त्रस्त झाले आहे. त्यात नव्याने भूसंपादनाचे गाजर दाखवून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जमिनी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शासन भूसंपादनास ‘योग्य मोबदला’ देणार असल्याचा दावा करत असले, तरी यापूर्वीच्या अनेक प्रकल्पांत शेतकऱ्यांना वेळेवर किंवा पुरेसा मोबदला न मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकरी, आणि स्थानिक रहिवाशांना विचारात न घेता घेतला जाणारा निर्णय नेहमीप्रमाणेच जनतेवर अन्याय करणारा ठरतो. शिवाय, रेल्वेमार्गासाठी आठ स्टेशन प्रस्तावित असूनही स्थानिक प्रवाशांच्या दैनंदिन सोयी-सुविधांबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नाही.
अशी ‘महत्वाकांक्षी’ प्रकल्पं म्हणजे केवळ कागदावरचे स्वप्नच ठरत आहेत. याआधीही अनेक वेळा या परिसरात उड्डाणपुल, मेट्रो, रस्ते सुधारणा, औद्योगिक झोन यासारख्या योजनांची घोषणा झाली; पण प्रत्यक्षात काहीच घडलं नाही. त्यामुळे तळेगाव-चाकणकरांना हा नवा रेल्वे मार्ग आणि मेगा टर्मिनल म्हणजे केवळ आणखी एक खैरात आणि राजकीय स्वार्थाची खेळी वाटत आहे.
सरकारने या भागातील नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेणे थांबवावी आणि आधी दिलेली आश्वासनं पूर्ण करावी. अन्यथा हा सगळा प्रकल्पही निव्वळ गाजर दाखवण्यापुरताच राहील, अशी जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे.













