- ‘आप’ने रस्ता बंद करून वेधले प्रशासनाचे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२५) :- पुणे-मुंबई महामार्गावरील कासारवाडी परिसरात सिमेंटच्या रस्त्यावर मोठे खड्डे व चिरे पडल्याने दुचाकीस्वारांसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या खड्ड्यांमुळे वाहनांचे तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता वाढली असून संभाव्य जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे.
पिंपरी चिंचवड आम आदमी पक्षाचे सचिव यलप्पा वालदार यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन व्हिडीओद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली. त्यांनी एका झाडाची फांदी उचलून रस्त्यात टाकत वाहतूक अडवून त्या खड्ड्यांमधून गाडी जाऊ नये यासाठी खबरदारी घेतली.
या प्रकाराचा व्हिडीओ महापालिकेच्या बीआरटी विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाला दाखवून तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांकडून दिला जात आहे.
“हा रस्ता जीवघेणा झाला आहे. महापालिकेने तातडीने उपाययोजना केली नाही, तर भविष्यातील कोणतीही दुर्दैवी घटना महापालिकेच्या हलगर्जीपणामुळेच होईल,” असा इशारा वालदार यांनी दिला.










