- गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची ५७ लाखांची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२५) :- पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी एका मोठ्या सायबर फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश करत पुण्यातील चित्रपट निर्मात्याला अटक केली आहे.
शिवम बाळकृष्ण संवत्सरकार (रा. एरंडवणे, पुणे) या आरोपीने चायनीज व्यक्तीच्या संपर्कात राहून गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
फिर्यादी यांना यूट्युबवर शेअर बाजाराबाबतचा एक व्हिडिओ पाहताना त्याखाली दिलेल्या व्हॉट्सअॅप लिंकवरून गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यात आले. “Abbott Wealth” नावाच्या अॅपवर रजिस्ट्रेशन करून, तब्बल ₹५७.७० लाख गुंतवण्यास भाग पाडले. काही दिवसांत अॅपवर ₹५.१५ कोटींचा नफा दाखवण्यात आला, मात्र पैसे मागितल्यावर विविध शुल्कांची मागणी होऊ लागली. यावरून संशय आल्याने त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली.
गुन्ह्याच्या तपासात आयडीएफसी बँकेतून संबंधित रक्कम बालाजी इंटरप्रायझेस नावाच्या खात्यात गेल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून शिवम संवत्सरकार यास अटक करण्यात आली. चौकशीत त्याने चायनीज व्यक्ती ‘बाम्बीनो’च्या मदतीने बँक खाती सायबर गुन्ह्यासाठी वापरल्याची कबुली दिली.
आरोपीकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून, इतर दोन बँक खातीही फसवणुकीसाठी उघडल्याचे आढळले आहे.
या कारवाईत पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून इतर संभाव्य फसवणुकीपासून नागरिकांचे संरक्षण केले. आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता व आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे करीत आहेत.












