न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या सहा सहायक आरोग्य अधिकाऱ्यांना हलगर्जीपणामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
ही नोटीस महापालिकेचे उपआयुक्त (आरोग्य) सचिन पवार यांच्या वतीने पाठवण्यात आली आहे.
२६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता महापालिका मुख्यालयात आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, सहायक आरोग्य अधिकारी राजू साळुंखे, सुबीर वाघमारे, तानाजी दाते, राजेश भाट, डॉ. के. डी. दरवडे आणि अंकुश झिटे हे अधिकारी या बैठकीस अनुपस्थित राहिले.
ही बैठक विभागाच्या कामकाजाच्या सुधारणा, कर्मचारी तक्रारींचे निवारण आणि कार्यपद्धतीत सुसूत्रता आणण्यासाठी अत्यंत आवश्यक होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांची अनुपस्थिती ही गंभीर स्वरूपाची असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
त्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस प्राप्त झाल्यापासून तीन दिवसांच्या आत आपले लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा, त्यांच्यावर प्रशासन स्तरावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
महापालिकेच्या कारभारात अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने सहभाग घेणे अपेक्षित असून, अशा प्रकारची उदासीनता भविष्यात सहन केली जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.












