- उपसभापती अण्णासाहेब बनसोडे यांच्या अवमानाविरुद्ध तीव्र निषेध मोर्चा..
- पिंपरी चिंचवड शहरात आंबेडकरी जनतेचा आक्रोश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ ऑगस्ट २०२५) :- महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा आयुक्तांकडून झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व सर्वपक्षीय नेत्यांनी भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केले.
या मोर्चात 5000 हून अधिक आंबेडकरी कार्यकर्ते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
मोर्चाची सुरुवात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यापासून झाली व सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या निषेध सभेने झाली. सभेचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत यांनी भूषवले. यावेळी रिपब्लिकन चळवळीचे नेते सुरेश निकाळजे, डॉ. बाबा कांबळे, राहुल डंबाळे, दीपक केदारी, जगदीश गायकवाड, दशरथ कसबे, धर्मपाल तंत्रपाळे, कुणाल वावळकर, प्रतीक कर्डक, अजिज शेख, बाळासाहेब रोकडे, विजय डोळस, संदिपान झोंबाडे, ज्ञानेश्वर कांबळे, गंगा धेंडे, सुप्रिया काटे, सिकंदर सूर्यवंशी, अंजना गायकवाड आदींसह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
नेत्यांनी सात दिवसांत आयुक्तांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत इशारा दिला. कारवाई न झाल्यास महापालिकेला टाळा ठोकण्याचे तीव्र आंदोलन छेडले जाईल. बनसोडे कुटुंबीयांपैकी सिद्धार्थ बनसोडे यांनी आंबेडकरी जनतेचे मनःपूर्वक आभार मानत “अण्णांसाठी दाखवलेले प्रेम आम्ही विसरणार नाही,” अशी भावना व्यक्त केली.
याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे शहराध्यक्ष संजय अवसरमल यांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाईसाठी पोलीस उपायुक्तांकडे तक्रार सादर केली. निवेदन पोलीस उपायुक्त संदिप आटोळे आणि सहायक पोलीस आयुक्त हिरे यांनी स्वीकारले.
हा मोर्चा भावनिक व कायदेशीर पद्धतीने आयोजित करून अन्यायाविरुद्ध लढण्याचा ठाम संदेश देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वांवर आधारित हा लढा पिंपरी चिंचवडमधील सामाजिक न्यायाच्या चळवळीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.












