- १० ते १५ लाख भाविकांच्या गर्दीचा अंदाज..
- पिंपरी चिंचवड पोलिसांची अशी आहे विशेष वाहतूक व्यवस्था…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि १० नोव्हेंबर २०२५) :- श्री क्षेत्र आळंदीत दरवर्षी आयोजित होणारी कार्तिकी यात्रा यंदा १२ ते २० नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणार असून, दर्शनासाठी राज्यभरातून १० ते १५ लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे. १५ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी तर १७ नोव्हेंबरला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा संजीवन समाधी सोहळा असल्याने आळंदी व आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे.


भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन जाहीर केले आहे. १२ ते २० नोव्हेंबरदरम्यान शहरातील आळंदी–देहू–चाकण–तळेगाव मार्गावरील अनेक रस्ते बंद व वाहतूक वळविण्यात येणार आहे.
यामध्ये वाकड, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, चिखली, मोशी, भोसरी, आळंदी फाटा आदी ठिकाणी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. आळंदी व देहुगावकडे जाणाऱ्या जड वाहनांना प्रवेशबंदी लागू राहील. तसेच प्रमुख चौकांवर तात्पुरते पार्किंग झोन, एसटी/पीएमपीएमएल बसस्टॉप बदल आणि वाहनांना वळविण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर, गाथा मंदिर आणि भंडारा डोंगराकडे जाणाऱ्या मार्गांवर गर्दीचे प्रमाण लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष नियंत्रण कक्ष, मार्गदर्शक फलक आणि सुरक्षा टेहळणीची व्यवस्था केली आहे.
वाहतूक बदलांची संपूर्ण माहिती आणि नकाशे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
“यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक दाब वाढतो. भाविकांचे दर्शन सुरळीत व्हावे आणि शहरातील दळणवळण अखंडित राहावे यासाठी वाहतूक बदल लागू करण्यात आला आहे,” असे वाहतूक शाखेचे उपायुक्त विवेक पाटील यांनी सांगितले.
नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.












