- किवळेत नागरिकांकडून महापालिकेच्या कारभाराचं श्राध्द..
- पिंडाला कावळा शिवण्याची प्रतीकात्मक कृती करत नोंदवला निषेध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. १३ ऑगस्ट २०२५) :- किवळे स्मशानभूमीतील मूलभूत सुविधा व रखडलेल्या विकासकामांकडे महापालिकेने सातत्याने दुर्लक्ष केल्याने फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या वतीने मंगळवारी दुपारी श्राद्ध आंदोलन करण्यात आले. अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पिंडाला कावळा शिवण्याची प्रतीकात्मक कृती करत निषेध नोंदविला.
किवळे आणि विकासनगर परिसरातील लोकसंख्या ५० हजारांपेक्षा जास्त असूनही स्मशानभूमीत फक्त दोनच जाळ्या आहेत. महिलांसाठी कपडे बदलण्याची खोली, शौचालय, प्रशस्त प्रतीक्षा कक्ष, मोठा विसावा कट्टा यांचा अभाव आहे. परिसरात कचरा टाकला जातो, नदीपात्रात जलपर्णी वाढली आहे, तर साफसफाईही नियमित होत नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली.
स्मशानभूमीचे आरक्षण ताब्यात घेणे, आवश्यक सुधारणा करणे आणि निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात असूनही कार्यवाही न झाल्याने हा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला.
आंदोलनावेळी बापदेव महाराज ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब तरस, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष बापूसाहेब कातळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, महापालिका ‘ब’ प्रभाग स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता संदीप खोत व अमोल पवार यांच्या पुढाकाराने जलपर्णी काढणे आणि काही सुधारणा सुरू करण्यात आल्या. लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, वचनभंग झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा तंतरपाळे यांनी दिला.
















