- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ध्वजारोहणावर नागरिकांचा बहिष्कार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड (दि. १३ ऑगस्ट २०२५) :- देहूरोड मुख्य बाजारपेठेतील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण होणार असले, तरी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आवारातील अधिकृत ध्वजारोहण कार्यक्रमाला नागरिकांनी अनुपस्थित राहून बहिष्कार घालावा, असे आवाहन स्थानिक पातळीवर करण्यात आले आहे.
देशातील अनेक कॅन्टोन्मेंट बोर्डांचे रूपांतर नगरपालिका, नगरपरिषद किंवा नगरपंचायतीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे; मात्र देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला या प्रक्रियेपासून वगळण्यात आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा आणि विकासकामांच्या अडचणी कायम राहिल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याच्या मागणीसाठी देहूरोड शहर कृती समितीच्या माध्यमातून रविवारी (दि. १०) मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक सामाजिक संस्था, संघटना, मंडळे तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.
मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर, कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त होईपर्यंत कर भरणे थांबविण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील काळात लढा अधिक तीव्र केला जाईल.












