- ११० बांधकामांना नोटीसा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १२ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ड आणि ब क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने मुंबई–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सेवा रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबवण्यात आली. ड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने पवना नदी पुलापासून मुळा नदी पुलापर्यंत अंदाजे ७ किलोमीटर लांबीच्या मुख्य महामार्गालगतच्या दोन्ही बाजूंच्या २४ मीटरपर्यंतच्या सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यात आली. यासाठी ११० बांधकामांना नोटीस देऊन कारवाई करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालय अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या अधिपत्याखाली ड क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित, ब क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
कारवाई वेळी कार्यकारी अभियंता (शहरी दळणवळण), अनधिकृत बांधकाम विभागाचे उपअभियंता, बीट निरीक्षक, विद्युत विभागाचे उपअभियंता, नगररचना विभागाचे सर्वेयर, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ७० जवान, तसेच वाकड व रावेत पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी ८ जेसीबी, २ क्रेन, ३० मजूर, ब्रेकर यांसारखी यंत्रसामग्री वापरण्यात आली.
तर ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाई दरम्यान बांधकाम परवानगी विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ५ बीट निरीक्षक, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ५५ जवान, २० पोलीस कर्मचारी व अधिकारी, महापालिकेचे ५ मजूर, १२ खासगी मजूर यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. यासाठी ६ जेसीबी मशीनचा वापर करण्यात आला.
वाहतूक सुकर व सुरळीत होण्यास मदत!
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या मोहिमेमुळे मुंबई – बंगळुरू महामार्गालगतचे सेवा रस्ते अतिक्रमणमुक्त होऊन वाहतुकीसाठी सुरक्षित आणि सुकर झाले आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. तसेच या सेवा रस्त्यांवर कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण केल्यास महापालिकेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.












