न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. 16 ऑगस्ट 2025) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण प्रख्यात व्यावसायिक अमरीश कक्कड यांच्या हस्ते झाले. उपस्थितांनी सामूहिक राष्ट्रगीत सादर करून ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.
या प्रसंगी श्री. कक्कड यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते झाला. व्यासपीठावर डॉ. भूपाली शहा, डॉ. तेजल शहा, डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. राजेंद्र कांकरिया, डॉ. सचिन बोरगावे, डॉ. पौर्णिमा कदम, डॉ. वनिता कुर्हाडे, वृंदा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या उपप्राचार्या लीजा सोजू व समन्वयिका गुलनाज खान यांच्या मार्गदर्शनाखाली १३० हून अधिक विद्यार्थ्यांनी सैनिकी वेशभूषेत नेत्रदीपक परेड केली. माजी सैनिक रमेश वराडे व एस.एम. भगवान उत्तेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विशेष नैपुण्य मिळवलेल्या प्राध्यापक, शिक्षक, खेळाडू व गुणवंत विद्यार्थ्यांचा श्री. कक्कड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच क्वीक हील फाउंडेशनच्या सायबर एज्युकेशन फॉर सायबर सिक्युरिटी या उपक्रमांतर्गत सायबर वॉरियर्स पथकातर्फे विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेची शपथ दिली.
मार्गदर्शन करताना कक्कड म्हणाले, “देशाच्या प्रगतीत शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक महत्वाची भूमिका निभावतात. मात्र युवकांची जबाबदारी सर्वाधिक आहे. स्वातंत्र्यदिन फक्त ध्वज फडकविण्यापुरता मर्यादित न ठेवता प्रत्येकाने जागरूक नागरिक म्हणून कर्तव्य बजावले पाहिजे. स्वप्न पाहण्याबरोबरच प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण, परिसर स्वच्छता आणि सामूहिक सहभागातूनच ‘विकसित भारत’ शक्य आहे.”
अध्यक्षीय भाषणात डॉ. दीपक शहा म्हणाले, “भारत आज तंत्रज्ञानात पुढे जात आहे. अनेकांचे योगदान या प्रवासात महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना आपल्याला विकसित भारताच्या दिशेने सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक घटकाने जबाबदारी ओळखून एकजुटीने काम केले, तर आपली स्वप्ने पूर्ण होतील.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा गायकवाड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. मनीषा पाटील यांनी करून दिला, तर आभार प्रा. पल्लवी चव्हाण यांनी मानले. ध्वजारोहणाच्या तयारीसाठी डॉ. आनंद लुंकड, प्रा. पांडुरंग इंगळे, प्रा. शबाना शेख, डॉ. अभय पोद्दार व संदीप शहा यांनी विशेष परिश्रम घेतले.
















