- ह.भ.प. निवृत्ती महाराज कदम धाराशिवकर यांचे प्रवचनातून आशीर्वाद…
पिंपरी (दि. 16 ऑगस्ट 2025) :- मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष व राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र अरुण पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
या निमित्ताने ग्रंथदानातून ७५० ज्ञानेश्वरी, ९२५ तुकाराम गाथा, १२५ संविधान प्रत, तसेच ५७०० वृक्षांची रोपे यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय ४०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले.
नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट कार्ड सेवा उपक्रमाचा शुभारंभ अभिनेत्री साक्षी चौधरी व योगशिक्षिका मीनाक्षी खैरनार यांच्या हस्ते झाला. यामध्ये मतदान कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड आदींचे मोफत स्मार्ट कार्ड तयार करून देण्यात आले. या सेवेचा लाभ ४७०० नागरिकांनी घेतला.
ह.भ.प. निवृत्ती महाराज कदम धाराशिवकर यांनी प्रवचनातून आशीर्वाद देत सांगितले, “अरुण पवार यांनी प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द आणि कष्टांच्या जोरावर मिळवलेले यश प्रेरणादायी आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांचा तसेच वृक्षांचा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे. त्यामुळे ते भावी आयुष्यात मोठी झेप घेतील.”
दरम्यान, संत तुकाराम महाराज भजनी मंडळ, विठ्ठल-रुक्मिणी भजनी मंडळ आदींच्या सहभागातून भजनाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला ह.भ.प. मारुती माऊली कोकाटे, समाजप्रबोधनकार शारदाताई मुंढे, माजी नगरसेवक नाना काटे, राहुल कलाटे, विजूअण्णा जगताप, राजेंद्र जगताप, अतुल शितोळे यांच्यासह विविध मान्यवर, संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
सूत्रसंचालन सोमनाथ नाडे यांनी तर, आभार प्रदर्शन वामन भरगंडे यांनी मानले.
















