न्यूज पीसीएमसी नेटवर्क
(पिंपरी, 16 ऑगस्ट 2025) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सक्रिय सहभाग नोंदवता यावा यासाठी सुरु केलेल्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आगामी अर्थसंकल्प २०२६-२७ साठीही नागरिकांच्या सूचनांची नोंदणी १५ ऑगस्टपासून सुरु झाली आहे.
मागील वर्षी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पासाठी महापालिकेला आठ प्रभागांतून २ हजार २७९ सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ७८६ सूचना स्वीकारण्यात आल्या व ४९९ कामांना निधी मंजूर करण्यात आला. या कामांसाठी सुरुवातीला ९४.८६ कोटी रुपयांची तरतूद केली असली, तरी प्रत्यक्षात सामाजिक व मूलभूत कामांसाठी तब्बल १३८.९८ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
विशेषतः ड प्रभागातील पुनावळे, ताथवडे, वाकड व पिंपळे सौदागर भागात मुख्य रस्ते, ड्रेनेज व उद्यानांसाठी ४३.८८ कोटींचा निधी मंजूर झाला. तर रावेत, किवळे परिसरातील कामांसाठी २०.६० कोटींची तरतूद झाली. नागरिकांच्या सूचनांमध्ये रस्ते, पादचारी मार्ग, उद्याने, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा, सीसीटीव्ही यांचा समावेश होता.
आता २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातही परिसरातील मालमत्ता कराच्या १० टक्के निधीतून नागरिक सुचवलेली कामे करण्यात येणार आहेत. नागरिकांना ऑनलाईन तसेच प्रभाग कार्यालयात प्रत्यक्ष अर्जाद्वारे सूचना देता येतील.
“नागरिकांच्या सहभागामुळे अर्थसंकल्प सर्वसमावेशक होतो आणि शहराच्या गरजेनुसार विकास साधता येतो.” – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका…
















