न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (१६ ऑगस्ट २०२५) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प केला आहे. या ध्येयपूर्तीसाठी आजचे विद्यार्थी हेच उद्याचे विकसित भारताचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणे ही समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.
पिंपळे निलख येथील सचिन साठे सोशल फाऊंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे यावर्षी २१वे वर्ष पूर्ण झाले. कार्यक्रमाला भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी आमदार अश्विन जगताप, प्रा. गणेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी सचिन साठे म्हणाले, “दहावी-बारावीमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि समाजातील मान्यवरांचा गौरव केल्याने इतरांना प्रेरणा मिळते. त्यामुळे हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.” शत्रुघ्न काटे यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनत, चिकाटी आणि वेळेच्या नियोजनामुळे मिळालेल्या यशाचे कौतुक केले. अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी विद्यार्थ्यांचा सन्मान हा त्यांच्यासाठी मोठी प्रेरणा असल्याचे सांगितले.
यावेळी स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप स्मृती पुरस्कार (बारावी प्रथम क्रमांक – ₹१५,५५५ रोख व सन्मानचिन्ह) वरद मनीष गुप्ता याला प्रदान करण्यात आला. तर स्व. सुरज नांदगुडे स्मृती पुरस्कार (दहावी प्रथम क्रमांक – ₹११,१११ रोख व सन्मानचिन्ह) अवनी सचिन गुंड हिला मिळाला. तसेच ८५% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्मार्टवॉच, सन्मानचिन्ह व स्कूल बॅग देण्यात आल्या.
प्रमुख अतिथींच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थी, पालक व नागरिकांची उपस्थिती होती.
















