न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, १६ ऑगस्ट २०२५ : पिंपरी-चिंचवड व मावळवासीयांचा मुख्य पाणीपुरवठा करणारे पवना धरण तब्बल ९५ टक्के भरले असून आज (शनिवार) शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते जलपूजन पार पडले. धरणातील पाणीसाठा वर्षभर पुरेल एवढा असून शहरवासीयांना टंचाईचा सामना करावा लागणार नाही.
खासदार बारणे म्हणाले, “मागील आठ वर्षांत ८५ हजार क्युबिक मीटर गाळ काढल्यामुळे धरणाची साठवण क्षमता वाढली आहे. पूर्वी दोन दिवसाआड पाणी मिळायचे, मात्र आता स्थिती सुधारली आहे. पवना नदी सुधार प्रकल्पालाही गती मिळाली असून नदीकाठच्या गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जातील. त्यामुळे नदी स्वच्छ राहील आणि नागरिकांना अधिक शुद्ध पाणी मिळेल.”
या कार्यक्रमाला पवना धरणाचे अभियंता रजनीश बारिया, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवना धरणातून दररोज ६ एमएलडीहून अधिक पाणी शहराला पुरवले जाते.
















