- आयुक्तांनी हिरवा सिग्नल दिल्यास मेट्रो प्रकल्पास मिळु शकते गती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो प्रकल्पाला आणखी चालना मिळणार असून निगडी ते चाकण दरम्यान दुसऱ्या मेट्रो मार्गाचा सविस्तर आराखडा (डीपीआर) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (महामेट्रो) पिंपरी चिंचवड महापालिकेकडे सादर केला आहे. ४०.९२६ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर ३१ स्थानके असतील.
या प्रकल्पासाठी सुमारे १० हजार ३८४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सद्य:स्थितीत दापोडी ते पिंपरी हा मेट्रो मार्ग कार्यान्वित आहे. त्याचे निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत विस्तारीकरण सुरू आहे. यानंतर भक्ती-शक्ती चौक ते चाकण असा दुसऱ्या टप्प्यातील मार्ग प्रस्तावित आहे. या उन्नत मार्गात २५ स्थानके पिंपरी-चिंचवड हद्दीत येतात.
महापालिका १५ हजार ९०९ चौ.मी. जागा उपलब्ध करून देणार आहे, तर राज्य शासन व खासगी मालकीतील जागा देखील संपादित केली जाणार आहे. या प्रकल्पातील निधी उभारणीसाठी केंद्र व राज्य शासन प्रत्येकी १० टक्के, महापालिका १५ ते २० टक्के वाटा उचलणार असून उर्वरित ६० टक्के रक्कम कर्जाद्वारे मिळविण्यात येईल. महापालिकेच्या सभेत मान्यता मिळाल्यानंतर आराखडा राज्य शासनाकडे आणि त्यानंतर केंद्र शासनाकडे पाठविला जाणार आहे. अंतिम मंजुरी मिळाल्यावर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.
या मार्गामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह चाकण एमआयडीसी परिसर मेट्रोशी जोडली जाईल. परिणामी, प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार असून औद्योगिक भागातील वाहतुकीला नवी दिशा मिळणार आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यामुळे शहराचा सुमारे ७५ टक्के भाग मेट्रोशी जोडला जाईल. यामुळे नागरिकांना स्वस्त, जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाची नवी सुविधा मिळेल.”
तर, महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले, “निगडी-चाकण मेट्रो मार्गाचा आराखडा सादर केला असून लवकरच चर्चा पूर्ण करून पुढील टप्प्यात मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येईल.”
निगडी–चाकण मेट्रो मार्गावरील स्थानके :- • भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक (निगडी) • ट्रान्सपोर्टनगर • गणेशनगर • मुकाई चौक • रावेत • पुनावळे गाव • पुनावळे • ताथवडे गाव • ताथवडे • भुमकर चौक • भुजबळ चौक • वाकड • विशालनगर कॉर्नर • कोकणे चौक • पिंपळे सौदागर • पिंपळे गुरव • नाशिक फाटा • संत तुकारामनगर • वल्लभनगर (वायसीएमजवळ) • गवळीमाथा चौक • भोसरी एमआयडीसी • वखार महामंडळ गोदाम चौक • पीआयईसी • भारतमाता चौक (मोशी) • चिंबळी फाटा • बर्गेवस्ती • कुरळी • आळंदी फाटा • नाणेकरवाडी • चाकण • (एक अतिरिक्त प्रस्तावित स्थानक – तपशील नंतर निश्चित होणार).
















