- मतचोरी, भ्रष्टाचाराच्या बॅनरवर अण्णांची प्रतिक्रिया..
- युवाशक्तीने पुढे यावं; हजारेंचा युवकांना संदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १८ ऑगस्ट २०२५) :- “अण्णा आतातरी उठा, देश भ्रष्टाचार आणि मतचोरीत अडकला आहे” असा मजकूर असलेले बॅनर पुण्यात झळकल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “भ्रष्टाचार रोखण्यासाठी मी आयुष्यभर लढलो, माहितीच्या अधिकारासह दहा महत्त्वाचे कायदे घडवून आणले. पण आता ९० वर्षांचा झाल्यानंतरही लोक मला उठवतात, ही खेदाची बाब आहे,” असे ते म्हणाले.
हजारे पुढे म्हणाले, “फक्त दुसऱ्यांवर बोट ठेवून बदल घडत नाही. तरुणांनी स्वतःहून पुढे यायला हवे. युवाशक्ती हीच खरी राष्ट्रशक्ती आहे. कायद्यांची ताकद मी तरुणांच्या हाती दिली आहे, आता त्यांच्या पुढाकारातूनच भविष्य घडणार आहे.”
स्वातंत्र्यदिनाच्या संदर्भाने त्यांनी देशभक्तीबाबत संदेश दिला. “हातात तिरंगा घेऊन घोषणा दिल्या की, देशभक्ती सिद्ध होत नाही. ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्यांची आठवण ठेवणे, त्यांचे आदर्श आचरणात आणणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
















