न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील २४ x ७ कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत राजेश फलके यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व मुख्यमंत्री फडणवीस यांना चौकशी करण्याबाबत पत्र पाठविले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ”पाणीपुरवठा विभागातील २४ x ७ चे काम मागील तीन वर्ष विश्व इन्फ्रास्टक्चर ली. संस्था करीत आहे. सदर निविदा १४३ कोटी रुपयांची आहे. तसेच सदर संस्था आपल्या कामामध्ये कसूर करीत आहे, असे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. परंतु, यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे काही अधिकारी सामील असल्यामुळे विश्व इन्फ्रास्टक्चर ली. या संस्थेला आपले मनमानी कारभार करण्यात हातभार लागत आहे.
प्राधिकरणामध्ये चालू असलेल्या सर्व कामामध्ये तसेच सेक्टर २८ आणि सर्वच भागामध्ये २४ x ७ चे रीकनेक्शन कामामध्ये भ्रस्टाचार होत आहे, असे निदर्शनास आले आहे. सदर कामामध्ये पाण्याच्या मीटरला जोडला जाणारा पाईप हा कमी प्रतिचा आहे. तसेच हा पाईप जमिनीखाली कमीतकमी ०.३ मी (१२ इंच) असावा असा निर्देश आहे. परंतु, तो पाईप जमिनीखाली केवळ ०.१ ते ०.१५ मीच (४ ते ६ इंच) आहे असे आपणास सर्व ठिकाणीच दिसेल, हा पाईप कमी प्रतिचा असल्यामुळे हा पाईप दाबला जात आहे. त्यामुळे पाण्याचा दबाव कमी होत आहे, असे सर्व कामामध्ये आपणास निदर्शनास येईल.
परंतू, सेक्टर २८ मध्ये हे काम चालू असताना ज्युनियर इंजिनीयर श्रीमती. प्रणिती मंगल यांस हे सांगितल्यावर त्यांनी शेड्युल B मला दिले गेले नाही, त्यामुळे मला नियम माहित नाही, आणि मोजणीची व बिल बनवण्याची जबाबदारी माझी नाही. तसेच तुम्हाला ज्यांनी माझा नंबर दिला आहे, त्यांच्याकडूनच लडकत साहेबांचा नंबर घ्या आणि त्यांनाच फोन करा, अशी बेजबाबदार उत्तरे देत आहेत. जेव्हा ह्या सर्व जबाबदाऱ्या त्यांच्याच आहेत, असे मला त्यांच्या वरिष्ठ अधिकारी प्रसाद देशमुख या साहेबांनी सांगितले आहे.
यासंदर्भात मी ज्युनियर इंजिनीयर प्रसाद देशमुख, डेप्युटी इंजिनीयर मोरनकर, एक्सिकेटीव्ह इंजिनीयर प्रवीण लडकत तसेच DRA कन्सलटन्टचे प्रतिनिधी सिद्धेश घोडके यांच्याशी सल्ला मसलत केली असून, यामध्ये विश्व इन्फ्रास्टक्चर ली. ही संस्था, ज्युनियर इंजिनीयर श्रीमती प्रणिती मंगल व तत्सम अधिकारी आपल्या कामात कसूर करीत असल्यामुळे महानगरपालिकेचे अतोनात नुकसान होत आहे. तरी, या संपूर्ण १४३ कोटीच्या कामाची चौकशी व्हावी आणि सदर संस्थेवर व दोषी अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई लवकरात लवकर व्हावी, असे या पत्रात फलके यांनी म्हटले आहे.













