न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०१९) :- एसटी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांना चार हजार किलोमीटरचा प्रवास मोफत असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवली जात आहे. त्यामुळे वल्लभनगर एसटी आगारात ज्येष्ठ नागरिकांची चौकशीसाठी गर्दी होत आहे. यावेळी एसटी कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांमध्ये वादही होत आहेत. मात्र अशी कोणतीही योजना नसल्याचे महाराष्ट्र आगाराकडून सांगण्यात येत आहे.
सोशल मीडियावर अनेक अफवा मेसेज पसरत आहेत. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांनाही होत आहे. नुकतेच व्हॉटस्अॅपवर एक अफवा पसरविण्यात आली आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी सेवा असल्याचे नमूद केले आहे. एसटी महामंडळाचा हा नवीन उपक्रम असून, ६५ वर्षे पूर्ण असणाच्या नागरिकांना स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात चार हजार किलोमीटरचा प्रवास फ्री असल्याचे व्हॉटस्अॅप मेसेजमध्ये नमूद केले आहे. यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, सोबत स्वतः व्यक्ती व नाममात्र ५५ रूपये फी आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. सर्व ज्येष्ठ व्यक्तींनी सदर कागदपत्रे घेऊन मध्यवर्ती बस स्थानकात जावे, असेही त्या मेसेजमध्ये नमूद केले आहे. या संदेशामुळे वल्लभनगर एसटी आगारात ज्येष्ठ नागरिक चौकशीसाठी गर्दी करत आहेत.
ही निव्वळ अफवाच आहे. सरकारच्या योजनेनुसार चार हजार किलोमीटरपर्यंतचा प्रवास ५० टक्के सवलतीत करता येतो. वल्लभनगर आगारात रोज ३० ते ३५ ज्येष्ठ नागरिक चौकशीसाठी येतात. त्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. दुसरी अशी कोणतीही योजना नाही.
– पी. व्ही. पाटील, सहायक वाहतूक अधीक्षक, वल्लभनगर एसटी














