न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. २० ऑगस्ट २०२५) :- वाकड परिसरात विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हुंडा व मूलबाळ न झाल्याचा तगादा लावून पतीसह सासरच्या मंडळींनी केलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने जीवन संपविल्याची फिर्याद नोंदवली आहे.
वाकड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम सह हुंडाबळी प्रतिबंधक अधिनियम कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी देवेंद्र खैरनार (रा. धुळे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची बहीण हिचा विवाह आरोपी हर्षल सुर्यवंशी याच्याशी झाला होता. मात्र लग्नानंतर नोकरी लागत नाही, माहेराहून फर्निचरसाठी पैसे आणले नाहीत आणि मूलबाळ होत नाही या कारणांवरून तीचा सतत शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. १८ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते सायंकाळी ७ या वेळेत वाकड येथील राहत्या घरी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणात पती हर्षल सुर्यवंशी (वय ३३) व सासरे शांताराम सुर्यवंशी (वय ६०) यांना पोलिसांनी अटक केली असून, सासू, जेठ व नणंद यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबासो चव्हाण करीत आहेत.












