महापालिकेच्या शाळांमधील ५७ हजार विद्यार्थ्यांना थेट लाभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील ५७ हजार ५६० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेतून वितरित करण्यात आले.
पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात ४२ हजार ७७० तर तिसऱ्या टप्प्यात १४ हजार ७९० विद्यार्थ्यांना साहित्य किट देण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने राबवलेल्या ई-रूपी पेमेंट प्रक्रियेमुळे ही योजना वेगवान, पारदर्शक व थेट पालकांपर्यंत पोहोचली. यामुळे मध्यस्थ व कागदी प्रक्रियेमधील विलंब टळला आणि विद्यार्थ्यांना वेळेत साहित्य मिळाले.
“डीबीटी हा विश्वासार्हतेचा नवा मापदंड ठरला असून प्रत्येक विद्यार्थी समानतेने लाभ घेत आहे,” असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
“ई-रूपी प्रक्रियेमुळे पालकांचा विश्वास वाढला असून महापालिकेच्या उत्तरदायी प्रतिमेला बळकटी मिळाली,” असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी नमूद केले.
“बालवाडीतल्या चिमुकल्यांपासून ते माध्यमिक विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार साहित्य मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे,” असे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी सांगितले.












