न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० ऑगस्ट २०२५) :- विवाहाचे आमिष दाखवून एका वकिलाने तरुणीची तब्बल १० लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला फिर्यादी (वय ३३, रा. देहुरोड, पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शार्दुल म्हेत्रे (वय ३५, रा. पुणे) याने ‘जीवनसाथी’ या मॅट्रोमोनी अॅपवरून फिर्यादीशी संपर्क साधला. लग्नाचे आश्वासन देत त्याने आई-वडिलांच्या आजारपणाचे तसेच वैयक्तिक अडचणीचे कारण सांगून वेळोवेळी पैसे मागितले.
फिर्यादीच्या विविध बँक खात्यांतून आणि क्रेडिट कार्डद्वारे आरोपीने एकूण १४ लाख ४४ हजार ७०० रुपये घेतले. त्यापैकी फक्त ३ लाख ९३ हजार ९१ रुपये परत केले, तर उर्वरित १० लाख ५१ हजार ६०९ रुपये परत न करता विवाह न करता फसवणूक केली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून अद्याप आरोपी अटकेत नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे करत आहेत.












