- कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या पाठपुराव्याला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : (दि. २१ ऑगस्ट २०२५) :- निगडी प्राधिकरण परिसरात बीएसएनएलच्या फायबर ऑप्टिकल्स केबल टाकण्याच्या कामादरम्यान झालेल्या गंभीर निष्काळजीपणामुळे तिघा मजुरांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल झाला असून न्यायालयीन चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे. कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले आहे.
१५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या दुर्घटनेने शहरातील कामगार वर्गात संताप निर्माण झाला होता. दोषींविरुद्ध कारवाईची मागणी करत पंचायतने पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर निगडी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
डॉ. कांबळे म्हणाले, “गुन्हा दाखल झाल्यामुळे पीडित कुटुंबांना न्यायालयीन आधार मिळेल. दोषींना कठोर शिक्षा व्हावी तसेच मृत मजुरांच्या कुटुंबांना ३० लाखांची आर्थिक मदत आणि बीएसएनएलमध्ये नोकरी मिळाली पाहिजे.”
त्यांनी पुढे सांगितले की, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षाविषयक साधनांचा वापर बंधनकारक करावा आणि कंत्राटी कामगारांना विमा व कायम कामगारांप्रमाणे सुविधा द्याव्यात.
कष्टकरी कामगार पंचायतने स्पष्ट केले की, पीडित कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील.












