- तीनजण सायबर पोलिसांच्या जाळ्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : (दि. २१ ऑगस्ट २०२५) :- हिंजवडीतील एका नामांकित आयटी कंपनीतून कॉपीराइट संरक्षित सोर्स कोड व डेटा चोरून स्वतःची नवी कंपनी स्थापन करून तब्बल ८२ कोटी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना सायबर पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड यांनी अटक केली आहे.
फिर्यादीच्या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पाहणारे बिश्वजीत मिश्रा याने सहकाऱ्यांसह सागर मधुकर विष्णु व नयुम सल्लाऊद्दीन शेख यांच्या संगनमताने कंपनीतील गोपनीय डेटा, सॉफ्टवेअर सोल्युशन्स व सोर्स कोड चोरी करून स्वतःची Apexionics Solutions Pvt Ltd नावाची नवी कंपनी सुरू केली. या फसवणुकीमुळे मूळ कंपनीला प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागला.
सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासानंतर १४ ऑगस्ट रोजी बाणेर येथील कंपनीवर छापा टाकून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ३ लॅपटॉप व ४ मोबाईल हस्तगत करण्यात आले. आरोपींनी अमेरिकन क्लायंट कंपनीच्या मदतीनेही गुन्हा केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
सध्या आरोपींना २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तांत्रिक तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या पथकाने केली.












