न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ ऑगस्ट २०२५) :- पिंपळे निलख येथील १६ वर्षीय बालगिर्यारोहक साई सुधीर कवडे याने लडाखमधील कांगयात्से १ (६४०० मी.) आणि कांगयात्से २ (६२५० मी.) या हिमशिखर मोहिमेत सहभागी होत ६०५० मीटरपर्यंत यशस्वी चढाई केली.
मर्खा खोऱ्यातील ११ दिवसांच्या मोहिमेत १५ सभासद सहभागी होते. लेह येथे acclimatization करून मोहिमेला सुरुवात झाली. कांगयात्से २ शिखर मोहिमेत साईने ५७०० मीटरपर्यंत चढाई केली तर कांगयात्से १ मोहिमेत त्याने ६०५० मीटरची उंची गाठली. टिममधील सहा सदस्यांनी शिखरमाथ्यापर्यंत यशस्वी चढाई पूर्ण केली.
साई हा लहानपणापासून गिर्यारोहण क्षेत्रात सक्रिय आहे. वयाच्या नवव्या वर्षी त्याने पहिली हिमालयीन मोहिम पूर्ण केली. आजवर आफ्रिकेतील किलीमांजारो, रशियातील एल्ब्रुस, नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅंप व काला पत्थर, दक्षिण अमेरिकेतील अकांकागुआ, तसेच भारतातील स्टोक कांग्री, फ्रेंडशिप, पतालसु अशी शिखरे त्याने सर केली आहेत. २०२२ मध्ये त्याने एव्हरेस्ट मॅरेथॉन पूर्ण करून विशेष यश मिळवले.
एव्हरेस्ट वीर भगवान चवले यांच्या द अल्पायनीस्ट संस्थेतर्फे ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. साई सध्या आदित्य कॉलेज, बाणेर येथे अकरावीला शिकत असून बालेवाडी क्रीडा संकुलातील रेसिंग वॉरियर्स क्लबमध्ये ॲथलेटिक्स सरावही करतो. त्याचे उद्दिष्ट सात खंडांतील सात सर्वोच्च शिखरे सर करून भारताचा तिरंगा फडकवण्याचे आहे.













