- ‘आप’ शहराध्यक्ष रविराज काळे यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ ऑगस्ट २०२५) :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त (२ ऑक्टोबर) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘विचार प्रबोधन पर्व’ आयोजित करावे, अशी मागणी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज बबन काळे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
गांधींचे विचार व कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक असून, या उपक्रमामुळे सत्य, अहिंसा व राष्ट्रसेवेच्या मूल्यांची जाणीव नागरिकांना होईल, असे काळे यांनी नमूद केले. त्यांनी आयुक्त, उपायुक्त तसेच जनता संपर्क अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी स्थळ, वेळापत्रक, मान्यवर अतिथी निमंत्रण, प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती आणि नियोजन बैठकीचे आयोजन करण्याची मागणी काळे यांनी केली आहे.
या उपक्रमाद्वारे शहरातील नागरिक विशेषतः तरुण पिढी गांधीजींच्या विचारांशी जोडली जाईल आणि समाजात त्यांचे आदर्श रुजतील, असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला.













