न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली, (दि. २६ ऑगस्ट २०२५) :- चिखली येथील श्री संत सावता माळी महाराज मंदिर येथे नुकतेच राष्ट्रभक्ती संस्करण महाकवी संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनात विविध भागातून आलेल्या तब्बल २०० कवींनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती डॉ. लक्ष्मण शिवणेकर, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील, माजी नगरसेवक तुषार हिंगे, अश्विनी जाधव, ज्येष्ठ पत्रकार व संपादक शिवाजीराव शिर्के, आयोजक अँड. रमेशअण्णा उमरगे, नितीन चिलवंत, शिवकुमार बायस, मनोहर दिवाण, रक्तदाता चंद्रकांत शिंदे, बसप्पा अण्णा रोडगे, उद्योजक नाना शिंदे, मानतेस अप्पा जालियाळ तसेच संत सावता महाराज मंदिराचे अध्यक्ष माऊली जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कवी संमेलनाच्या प्रारंभी डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपरी येथील स्वरगंध संगीत ग्रुप तसेच चिंचवडगाव येथील धनेश्वर एकतारी भजनी मंडळ यांनी देशभक्तीपर गीते आणि भक्तिमय भजने सादर केली. या कार्यक्रमात एकूण अकरा विद्यार्थी व भजनी मंडळाचे सदस्य सहभागी झाले होते.
संगीत सादरीकरणात प्रा. अनिता सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तनिष्क चिखलीकर, साईराज त्रिभुवन, प्रिशा जैन, पिनाक भिंगारे, मानसी दीक्षित, कंगना साह, रोशनी सायलेकर, ऋषिकेश गाडेकर, आयुष क्षीरसागर, ज्ञानेश्वरी कचगवंडे, वैष्णवी शेळके यांनी सहभाग घेतला. तर धनेश्वर एकतारी भजनी मंडळातील रविभाऊ गावडे, कैलास साठे, श्री. शिवले, गणेश लहरे आणि संग्राम चिंचवडे यांनी भजन व देशभक्तीपर गीते सादर केली.
या कार्यक्रमात ग्रंथ दिंडी, गो माता पूजन व रक्तदान शिबिर यांचे आयोजनही करण्यात आले. सहभागी कवी व कलाकारांचा सन्मान “आईच्यामायेचा स्पर्श” या काव्यसंग्रहासह प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. विजयकुमार पाटील म्हणाले, “भारतीय संत साहित्यात संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज व संत सावता माळी यांचे योगदान अतुलनीय आहे. अशा पुण्य नगरीत नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. या संमेलनात भक्ती, शक्ती आणि राष्ट्रप्रेम कवितावाचनातून प्रभावीपणे प्रकट झाले.”
नवोदित कवींना स्वागताचे शब्द अँड. रमेशअण्णा उमरगे यांनी व्यक्त केले तर आभार प्रदर्शन नितीन चिलवंत यांनी केले.












