न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (२६ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये गणेशोत्सवानिमित्त पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. शाडू माती व कागदापासून गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. शिक्षक व मार्गदर्शकांनी मूर्ती घडविण्याची पद्धत, आकारनिर्मितीचे बारकावे, सुरक्षित देखभाल आणि पर्यावरणपूरक विसर्जनाबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्तीला वाव देत रंगीबेरंगी बाप्पा साकारले. केवळ मूर्ती नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाची जाणीव हा उपक्रमाचा मुख्य संदेश ठरला. “विद्यार्थ्यांनी साकारलेला बाप्पा म्हणजे हरित विचारांचा पाया आहे. आनंद साजरा करताना निसर्गाचे रक्षण करणे आपली जबाबदारी आहे,” असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले. तर “विद्यार्थ्यांच्या हातून घडविलेल्या मूर्ती पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देतात,” असे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी म्हटले.
या उपक्रमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश सर्वत्र पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
                                                                    
                        		                    
							












