- पिंपरी चिंचवड महापालिकेचे यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक पाऊल…
 
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २६ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक विसर्जनासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे.
शाडू मातीच्या मूर्ती वापरण्याचे नागरिकांना आवाहन करूनही काही प्रमाणात Plaster of Paris (PoP) मूर्ती विसर्जित होण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा मूर्तींचे शास्त्रोक्त विघटन करण्यासाठी मनपाने १६२ टन अमोनियम बायकार्बोनेट (NH4HCO3) रसायन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास आयुक्तांनी सभेत मंजुरी दिली आहे.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही मंजुरी देण्यात आली.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स संस्थेकडून हे रसायन शासकीय दराने प्रति टन २४,६५० रुपये (GST सह) दराने उपलब्ध होणार असून, खरेदी खर्च ३९,९३,३०० रुपये आणि वाहतूक खर्च ४,५०,००० रुपये असा मिळून एकूण ४४,४३,३०० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मनपाच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी २०.२५ टन प्रमाणे हे रसायन वितरित केले जाणार असून, मूर्ती विघटनाची इतर आवश्यक व्यवस्था संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात येणार आहे.
                                                                    
                        		                    
							












