न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड, (दि. २७ ऑगस्ट २०२५) :- सालाबादप्रमाणे यंदा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव साजरा होणार असून, उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. आयुक्तालय हद्दीत २,१४६ सार्वजनिक व २,६५,२७४ घरगुती गणपतींची स्थापना होणार आहे.
सातव्या दिवशी ५२१, नवव्या दिवशी २३६, दहाव्या दिवशी ३७३ व अकराव्या दिवशी ९५९ सार्वजनिक गणेश विसर्जन होणार असून त्यासाठी ४५ विसर्जन घाटांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शांतता समित्या, मंडळांचे प्रतिनिधी, डीजे चालक आदींच्या बैठका घेऊन ध्वनीप्रदूषण टाळण्याचे आवाहन केले आहे. लेझर लाइट्स व डॉल्बीवर बंदी घालण्यात आली आहे.
कायदोव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी १,८०९ समाजविघातकांवर प्रतिबंधक कारवाई झाली आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक वळविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
उत्सव काळात १ सहआयुक्त, १ अपर पोलीस आयुक्त, ६ उपआयुक्तांसह तब्बल ३,००० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार असून, नागरिकांनी सहकार्य करून सण आनंदात साजरा करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले आहे.













