न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी, (दि. २७ ऑगस्ट २०२५) :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रहाटणी परिसरात मंगळवारपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. श्रीनगर, आझाद कॉलनी, जय भवानी चौक, शिवशक्ती कॉलनी, अंबिका कॉलनी व विनाई कॉलनी येथील नागरिकांना अखंडित वीजपुरवठ्याऐवजी सतत अंधाराचा सामना करावा लागत आहे.
काल सकाळपासूनच वीज गेल्यानंतर महावितरणकडे तक्रारी करण्यात आल्या. दुरुस्ती करून पुरवठा सुरूही झाला, पण केवळ पंधरा मिनिटांत पुन्हा बत्ती गुल झाली. त्यानंतर वीजच आलेली नाही. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत घरगुती कामकाज, पूजाअर्चा तसेच मुलांचे अभ्यास यावर परिणाम झाला आहे.
महावितरणकडून दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी वीजपुरवठा नेमका केव्हा सुरू होईल, याबाबत स्पष्ट माहिती दिली जात नाही. सततच्या वीजखंडितीमुळे रहाटणी परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.













