न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२५) :- आंध्र प्रदेशातील तडीपात्री, विशाखापट्टणमसह विविध महापालिकांचे वरिष्ठ अधिकारी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी विशेष दौऱ्यावर आले.
शिष्टमंडळाने दापोडी शून्य कचरा प्रकल्प, मोशीतील बांधकाम राडारोडा प्रक्रिया केंद्र, बायो मिथीलेशन प्रकल्प तसेच विविध ट्रान्स्फर सेंटर्सची पाहणी केली. महापालिकेच्या दारोदारी कचरा संकलन, वर्गीकरण आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट प्रक्रियेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
आयुक्त शेखर सिंह यांनी “शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेची सुविधा मिळावी, यासाठी शाश्वत व नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवित आहोत” असे सांगितले. तर अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी “महापालिकेचे प्रकल्प इतर राज्यांसाठी आदर्श ठरत आहेत” असे मत व्यक्त केले.
विशाखापट्टणम महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेशकुमार यांनी “पिंपरी चिंचवड महापालिकेची पर्यावरणपूरक धोरणे आमच्या शहरात राबविण्याचा मानस आहे” असे सांगून कौतुक केले.













