- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक; मतदान केंद्र निर्मितीला वेग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२५) :- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला वेग आला असून शहरातील ३२ प्रभागांत मतदान केंद्रांची निर्मिती सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या २६ जूनच्या आदेशानुसार हे काम हाती घेण्यात आले आहे. एका मतदान केंद्रात सरासरी ७०० ते ८०० मतदारांचा समावेश राहणार आहे.
प्रत्येक प्रभागासाठी दोन कार्यकारी अभियंते नियुक्त केले असून, मतदान केंद्रासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी १५ दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
२०१७ मध्ये शहरात १,६०८ मतदान केंद्रे होती. मात्र वाढलेल्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर यंदा केंद्रांची संख्या तब्बल २,३०० पर्यंत पोहोचणार आहे. म्हणजेच, मागील वेळेपेक्षा ६९२ केंद्रांची वाढ होणार आहे. प्रत्येक प्रभागासाठी एक सेक्टर ऑफिसर नेमण्यात आला असून तोच प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. या अधिकाऱ्यांची बदली निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत होऊ शकणार नाही.













