न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड, (दि. २८ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या नव्या १२६ पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीची घोषणा नुकतीच शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केली. या कार्यकारिणीत माजी उपमहापौर तुषार हिंगे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. परंतु निवड झाल्यानंतर केवळ एका दिवसातच त्यांनी वैयक्तिक कारणास्तव या पदाचा राजीनामा दिला आहे.
आपल्या राजीनाम्यात तुषार हिंगे यांनी नमूद केले आहे की, “मी वैयक्तिक कारणास्तव उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असून, पुढेही एक साधा कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या कार्यासाठी तितक्याच जोशात काम करत राहीन.”
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी २७ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या या ‘जंबो’ कार्यकारिणीत ४ महासचिव, ८ उपाध्यक्ष, ८ सचिव, प्रकोष्ठ प्रमुख तसेच अन्य सदस्यांसह १२६ पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी हिंगे यांच्याशी संपर्क साधला तो होऊ शकला नाही. दरम्यान नव्या कार्यकारिणीच्या घोषणेनंतर एकाच दिवसात हिंगे यांच्या राजीनाम्यामुळे पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे आव्हान कसे पेलतात? ते पाहणे मनोरंजक ठरेल.













