न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मोरवाडी येथे प्रशिक्षण सत्र २०२५-२६ सुरू झाले असून, २ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या पहिल्याच दिवशी पुष्पवृष्टी करून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
प्रवेशित सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्यावेळी त्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात आल्या.
प्राचार्य शशिकांत पाटील यांनी आयटीआयचे महत्त्व सांगताना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, डीजीटी यांच्या अखत्यारीत संस्था कार्यरत असल्याची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. महापालिकेचा टाटा मोटर्ससोबत डीएसटी अंतर्गत करार झाल्याचे त्यांनी नमूद केले.
गटनिदेशक किसन खरात यांनी शिस्त, हजेरीचे महत्त्व आणि नियमावली याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सर्व निदेशक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांची उपस्थिती लाभली. पालकांनीही संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.










