न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक यश मिळवले आहे.
बालेवाडी, पुणे येथे झालेल्या स्पर्धेत कै. दत्तोबा रामचंद्र काळे इंग्लिश मीडियम स्कूल, काळेवाडी येथील दया जाधव, अबुजर अन्सारी आणि सुमित गायकवाड यांनी पुणे जिल्हा रग्बी संघातून खेळत उपविजेतेपद पटकावले. दया जाधवने सामन्यातील एकमेव ट्राय नोंदवून आपली छाप सोडली.
दरम्यान, श्रीमती अनुसयाबाई नामदेव वाघेरे इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपरी येथील सूरज मदने (१४ वर्षाखालील) याने स्क्वॅशमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्यपदक पटकावले, तर प्रथमेश कुंभार (१७ वर्षाखालील) याने चौथा क्रमांक मिळवला.
आयुक्त शेखर सिंह यांनी विद्यार्थ्यांच्या चिकाटीचे कौतुक करत क्रीडेतून नेतृत्व व आत्मविश्वासाची शिकवण मिळते, असे सांगितले.










