न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील २६ जवानांचे विशेष पथक अलीकडेच कोलाड येथे फ्लूड रेस्क्यू प्रशिक्षणासाठी गेले होते. नैसर्गिक आपत्ती व पूरस्थितीत नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले आहे. वाहत्या पाण्यात पोहणे, जीवनरक्षक जॅकेटशिवाय बचावकार्य, बोटींवर सुरक्षित चढणे तसेच तातडीचा प्रतिसाद देण्याचे तंत्र जवानांना शिकवण्यात आले.
यावेळी प्राथमिक उपचारांचे विशेष मार्गदर्शनही देण्यात आले. सीपीआर, आर्टिफिशियल रेस्पिरेशन, रक्तस्त्राव थांबवणे, सर्पदंश उपचार, जखमींची सुरक्षित हालचाल अशा तंत्रांचा सराव झाला.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, “आपत्ती व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज असून हे प्रशिक्षण जवानांना अधिक सक्षम करेल.” उप अग्निशमन अधिकारी विजय घुले यांनी प्रशिक्षण प्रत्यक्ष परिस्थितीचा अनुभव देणारे ठरल्याचे सांगितले. तर जवान पूजा वालगुडे म्हणाल्या, “पूरस्थितीत शांत राहून योग्य तंत्र वापरण्याचे धडे मिळाले, त्यामुळे आता आत्मविश्वास वाढला आहे.”











