न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ सप्टेंबर २०२५) :- राज्य शासनाने यावर्षी गणेशोत्सव “राज्य महोत्सव” म्हणून घोषित केला असून, त्यानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील प्रमुख चौकांचे आकर्षक सुशोभीकरण केले आहे.
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चौक, शगुन चौक, सांगवीतील चंद्रमणी कॉलनी आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मृतीस्थळ चौक येथे विविध ऐतिहासिक व सांस्कृतिक विषयांवर आधारित सजावट करण्यात आली आहे. शगुन चौक व स्मृतीस्थळ चौकात ‘ऑपरेशन सिंदूर’वरील देखावे, चिंचवड गावात शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती, चंद्रमणी कॉलनीत महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूतील १ अशा जागतिक वारसा किल्ल्यांची माहिती, तर रामकृष्ण मोरे चौकात रायगड किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “गणेशोत्सव हा समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. राज्य महोत्सवानिमित्त महापालिकेने सादर केलेल्या देखाव्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.”
या सुशोभीकरणामुळे प्रमुख चौकांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.











