न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ सप्टेंबर २०२५) :- शिक्षक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ‘शिका आणि घडवा’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली, तर आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्यासह महापालिकेचे अधिकारी विद्यार्थी बनून धडे शिकले.
विज्ञानात घर्षण बलाचे प्रात्यक्षिक, हिंदी नाटक वाचन, चित्रकला, तसेच मराठी विषयात ‘जल दिंडी’ धडा घेऊन विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना शिकवले. पर्यावरण संवर्धन, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचा प्रत्यय या उपक्रमातून आला.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “मुलांच्या जिज्ञासू वृत्तीमुळे ज्ञान आत्मसात करणे किती सोपे होते, हे अनुभवायला मिळाले.” अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी विद्यार्थ्यांची सजगता अधोरेखित केली, तर सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी “मुलांचा आत्मविश्वास वाढवणारा उपक्रम” असे गौरविले.
शिक्षक दिनानिमित्त झालेला हा उपक्रम विद्यार्थी आणि अधिकारी वर्गासाठी संस्मरणीय ठरला.











